शेतकऱ्यांचे कपाशी-सोयाबीनचे स्वप्न पाण्यात; आमदार संतोष दानवे म्हणाले, “तुमच्या पाठीशी मी ठाम उभा”

जाफ्राबाद :
जाफ्राबाद तालुक्यातील देळेगव्हाण गावावर अतिवृष्टीने कहर केला. मेहनतीने उभे केलेले हिरवेगार शेत एका रात्रीत पाण्याखाली गेले आणि शेतकऱ्यांचे स्वप्न कोसळले. कपाशी, सोयाबीन, मूग-उडीद यासह हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आधीच कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी वर्ग आता आणखी एका आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. शेतातील उभ्या पिकांवर ओढवलेल्या या संकटामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे.
याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार संतोष दानवे स्वतः देळेगव्हाणमध्ये दाखल झाले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहून त्यांनी तात्काळ प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार संतोष दानवे म्हणाले की, “हे संकट तुमचं एकट्याचं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शासनाकडे पाठपुरावा करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय आणि मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन.”
या दिलाशाच्या शब्दांनी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, पण त्याच वेळी आशेचा किरण उजळला.
पाहणीवेळी तहसीलदार सौ. सारिका भगत, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती, ग्रामसेवक, तलाठी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.