धनगर आरक्षणाची धग वाढली.. जालन्यात सरपंचांनी पेटवले स्वतःचे चारचाकी वाहन

जालना :
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनांना जोर वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील एका सरपंचाने टोकाचं पाऊल उचललं आहे.
बदनापूर तालुक्यातील लोणार भायगाव येथील सरपंच गोविंद जाधव यांनी भर रस्त्यात स्वतःची गाडी पेटवून दिली. आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांनी हा निषेध व्यक्त केला. गाडी पेटवल्यानंतर जाधव यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा तीव्र
धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची मागणी ही नवी नाही. इंग्रजांच्या काळात आदिवासी जमातींना “क्रिमिनल ट्राईब” म्हणून वेगळं केलं गेलं आणि नंतर त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला. मात्र धनगर समाजाला अद्याप या प्रवर्गातून आरक्षण मिळालेलं नाही.
समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “धनगर समाज मागास नाही, असा दावा चुकीचा आहे. सुप्रीम कोर्टानेही स्पष्ट केले आहे की अनुसूचित जाती-जमातींचं मागासलेपण वेगळं तपासायची गरज नाही.”
समाजात संतापाचे वातावरण
आरक्षण मिळाल्यास धनगर समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रश्नावर सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे समाजात संतापाचं वातावरण असून ठिकठिकाणी आंदोलनं तीव्र होत आहेत.
जालना जिल्ह्यातील सरपंचाने उचललेलं टोकाचं पाऊल या आंदोलनाला नवी धार मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.