जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती अर्जासाठी मुदतवाढ : पुरपरिस्थितीमुळे प्रशासनाचा निर्णय

जालना : जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी जालना, अंबड, भोकरदन व परतूर यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध गावांमध्ये रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत पूर्वी ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील परिक्षार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करताना अडचणी आल्या.
या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक उमेदवारांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढ दिली असून, आता उमेदवारांना ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असल्याचे जालन्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या पत्रात म्हटले आहे.
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भातील अधिकृत सूचना जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.
परिक्षार्थ्यांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या बाबी :अर्ज करण्याची अंतिम तारीख – २ ऑक्टोबर २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागेल.
अंतिम तारखेनंतर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले असून, अनेक शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत भरतीसाठी अर्ज करण्यास वेळ मिळावा, हीच उमेदवारांची अपेक्षा होती. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे परीक्षार्थ्यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.