महाराष्ट्र

सुखी संसाराची स्वप्नं चुरडली ; छळाला कंटाळून पोलिस पत्नीचा अंत, पोलिस वसाहतीतच आत्महत्येची धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर :

छत्रपती संभाजीनगर शहर हादरवून सोडणारी घटना पोलिस आयुक्तालयातील वसाहतीत घडली आहे. एका पोलिस अंमलदाराच्या पत्नीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत पती आणि सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मृत महिलेचं नाव सबा समीर शेख (वय २१, राहणार आय ब्लॉक, पोलिस आयुक्तालय इमारत, संभाजीनगर) असं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सबा हिचा विवाह जवळपास अडीच वर्षांपूर्वी पोलिस अंमलदार समीर शेख याच्याशी झाला होता. समीर शेख सध्या जीन्सी पोलिस ठाण्यात विशेष शाखेत कार्यरत आहे.

लग्नानंतर सुरुवातीला सबाला चांगली वागणूक मिळाली. परंतु काही दिवसातच पती व सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वाढत्या त्रासामुळे सबा माहेरी गेली होती. मात्र, दोन्ही कुटुंबातील मध्यस्थीनंतर तिला पुन्हा सासरी नांदण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतरही पतीकडून वेगवेगळी बंधने आणि मानसिक छळ सुरूच असल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गुरुवारी (२ ऑक्टोबर) सकाळी अकराच्या सुमारास सबाने आयुक्तालयातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला नातेवाईकांनी चिस्त्या चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी तीनच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर सबाचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आला.

या घटनेनंतर सबाचे माहेरचे नातेवाईक मोठ्या संख्येने संभाजीनगरमध्ये दाखल झाले. त्यांनी संताप व्यक्त करत पती समीर शेख व सासरच्या मंडळीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस वसाहतीतीलच ही घटना घडल्याने दलात एकच खळबळ उडाली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.