महाराष्ट्र

गेवराईत थरकाप उडवणारी घटना : पित्याने ४ महिन्याच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून केली हत्या; स्वत: गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीड संग्रामभूमी न्यूज नेटवर्क:

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रामनगर येथे एका पित्याने क्रूर कृत्य करत आपल्या चार महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून ठार मारले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत पित्याचं नाव अमोल हौसराव सोनवणे असं आहे. तो आपल्या पत्नी पायल आणि चार महिन्यांच्या चिमुकल्यासोबत राहत होता. गुरुवारी रात्री दांपत्य जेवण करून झोपलं होतं. पहाटे पायलने बाळाला स्तनपान घातल्यानंतर झोप काढली. मात्र तासाभराने जाग आलेल्या अमोलने बाळाला आईच्या कुशीतून उचललं आणि पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून जीव घेतला. यानंतर स्वत: गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला.

चार दिवसांपूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न..
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा ट्रकचालक असून त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. चार दिवसांपूर्वीही दांपत्याने भांडणानंतर कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र दोघांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दसऱ्याच्या दिवशीच दोघं घरी परतले आणि दुसऱ्याच दिवशी अमोलने हे क्रूर कृत्य केलं.

दुसऱ्या लग्नानंतरही वाद..
अमोलचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पत्नीशी वाद झाल्याने ती माहेरी गेली होती. त्यानंतर दीड वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील पायलशी त्याचं लग्न झालं. पायल गरीब घरातील असून तिला आई नाही. या दांपत्याला चार महिन्यांपूर्वी मुलगा झाला होता, मात्र अद्याप त्याचं बारसं झालेलं नव्हतं. अमोल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने रामनगर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.