झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी उद्या भोकरदनला शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा — माजी आमदार चंद्रकांत दानवे
आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

भोकरदन :
भोकरदन- जाफ्राबाद तालुक्यातील मुसळधार पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे उद्या सोमवारी (ता.६) भोकरदन येथे “शेतकरी आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केले आहे.
मागील काही दिवसांत भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीतील पिके, जनावरे, घरे आणि धान्य पूर्णतः वाहून गेले. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असतानाही शासनाने अद्याप ‘ओला दुष्काळ’ घोषित केलेला नाही, अशी तीव्र नाराजी माजी आमदार चंद्रकात दानवे यांनी व्यक्त केली.
“शासन झोपले आहे, पण शेतकऱ्यांचा आक्रोश आता रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत द्यावी, हे आमचे ठाम मागणे आहे,” असे माजी आमदार चंद्रकात दानवे “संग्रामभूमी”शी बोलतांना म्हणाले.
भोकरदन शहरातील पंचायत समिती कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस रोहित दादा पवार, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार निलेश लंके व खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मोर्चाद्वारे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनापुढे प्रभावीपणे मांडल्या जाणार असून, दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
“शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, व्यापारी—सर्वांनी एकत्र येऊन शासनाच्या दुरदृष्टीला आरसा दाखवायची वेळ आली आहे. हा लढा न्यायाचा आहे, आणि प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी यावेळी केले.