“शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि सरकार झोपेत”
भोकरदन येथील शेतकरी आक्रोश मोर्चात शासनाविरोधात संतापाची लाट

भोकरदन : अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे आयोजित भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा सोमवारी भोकरदन येथे उत्स्फूर्तपणे पार पडला. या मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व व्यापारी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध व्यक्त करत नेत्यांनी थेट सरकारवर घणाघाती प्रहार केले.
शेतकऱ्यांचे बळी घेण्याचे पाप या सरकारने केले- रोहित पवार
या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहित दादा पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी आदरणीय शरद पवार साहेबांनी केली आहे. राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत देणे ही शासनाची जबाबदारी आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले, भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी ते सगळे विसरून टाकले. कर्जबाजारीपण, नापिकी, कोरडा आणि ओला दुष्काळ या सगळ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यात वर्षभरात दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या बळींचे पाप या सरकारच्या गळ्यात आहे.
त्यांनी पुढे सरकारवर टीका करताना म्हटलं, भाजप सरकारच्या काळात दडपशाही वाढली आहे. कुणी आवाज उठवला की त्याच्यावर कारवाई होते. आता सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हे सरकार केवळ आश्वासनांचं आणि दिखाव्याचं आहे.
आवाज उठवला की खोट्या केसेस; ही लोकशाही नाही- शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावेळी जोरदार भाषण करत सरकारला फैलावर घेतले. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे, मात्र या सरकारला त्याचे काहीच भान नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना मदतीची हमी दिली होती, ते आज गप्प आहेत. कुणी आवाज उठवला की त्याच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या जातात. ही लोकशाही नाही, ही हुकूमशाही आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाली नाही, तोपर्यंत या सत्ताधाऱ्यांना तुमच्याकडे मत मागण्यासाठी येऊ देऊ नका. सत्तेत येण्यापूर्वी दिलेली मोठी आश्वासने हवेतच विरली आहेत. राज्यात ओल्या दुष्काळाचे प्रचंड संकट असताना सरकारकडून ठोस निर्णय घेतले जात नाहीत. या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या टोकावर जावे लागत आहे. जर शासनाने वेळीच मदत केली असती, तर हे बळी वाचले असते.
चंद्रकांत दानवे यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट प्रहार….
या मोर्चात भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यात विद्यमान आमदार संतोष दानवे आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. पिता-पुत्रांच्या आशीर्वादाने येथे मनमानी व भ्रष्टाचार सुरू आहे. विहिरीसाठी ५० हजार, गोठ्यासाठी ३० हजार, आणि घरकूलासाठी २० हजार रुपये घ्यावे लागतात, हे दुर्दैवी वास्तव आहे. हा लुटमारीचा प्रकार थांबवण्यासाठीच शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.
या मोर्चात अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, जालन्याचे खासदार कल्याण काळे, माजी मंत्री राजेश टोपे, सुधाकर दानवे, प्रा डॉ अंकुश जाधव, माजी उपनगराध्यक्ष शफीक पठाण, माजी सभापती अब्दुल कदीर, संग्राम देशमुख, शब्बीर कुरेशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.