महाराष्ट्र

“धर्म नव्हे, माणुसकी मोठी ; शाहरुखने दिले कृष्णाला नवे आयुष्य!”

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील घटना

संग्रामभूमी न्यूज नेटवर्क:
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेततळ्यात घडलेली घटना माणुसकीचे दर्शन घडवणारी ठरली आहे. शेततळ्यात बुडणाऱ्या अकरा वर्षीय कृष्णा नरवडे या मुलाचे प्राण एका शौर्यवान तरुणाने वाचवले. जात, धर्म, नाव या साऱ्या भिंती बाजूला सारत “शाहरुख”याने फक्त ‘माणुसकी’ जपली.
मिळालेली माहिती अशी की, कृष्णा दुर्गादास नरवडे हा आईसोबत शेतात गेला होता. आई कामात मग्न असताना तो शेततळ्याच्या कडेला खेळत होता. खेळता खेळता पाय घसरून तो थेट तळ्यात कोसळला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागला आणि जीवघेण्या क्षणी त्याच्या तोंडून आरडाओरड सुरू झाली. याचवेळी शाळेत जात असलेला सार्थक कानडजे या विद्यार्थ्याने हा प्रकार पाहिला. त्याने तत्काळ कृष्णाच्या आईला सांगितले. आईने आरडाओरड केली, आणि हा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारा तरुण शाहरुख देवदूतासारखा धावत आला. क्षणाचाही विलंब न करता त्याने शेततळ्यात उडी घेतली आणि कृष्णाला बाहेर काढले. कृष्णाच्या नाकात आणि पोटात पाणी गेल्याने तो अर्धबेशुद्ध होता, मात्र वेळेवर केलेल्या धाडसी कृतीमुळे त्याचे प्राण वाचले.तत्काळ त्याला सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

शौर्यवान शाहरुखचे सर्वत्र कौतुक….

सध्याच्या काळात जाती-धर्माच्या नावावर समाजात तणावाचे वातावरण निर्माण होत असताना शाहरुखने दाखवलेली माणुसकी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. “माणूस हाच धर्म” हे दाखवून देणाऱ्या या कृतीबद्दल पंचक्रोशीतून शाहरुखचे कौतुक होत आहे. गावकऱ्यांनी शाहरुख आणि सार्थक कानडजेचा सत्कारही केला.

कृष्णा आईवडिलांचा नवसाचा एकुलता एक मुलगा..

कृष्णाचे आई-वडील रोजंदारीवर काम करून संसाराचा गाडा हाकतात. कृष्णा हा त्यांना नवसाने झालेला एकुलता एक मुलगा असल्याने ही घटना त्यांच्या आयुष्याला हादरा देणारी ठरली होती. परंतु शाहरुखच्या रूपानेच देव मदतीला आला आणि ‘काळ’ मागे हटला, असे भावनिक उद्गार ग्रामस्थांनी काढले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.