वाळूमाफियांवर महसूल विभागाचा धडाकेबाज छापा!
२७ वाहनांवर गुन्हे दाखल, ४३ ठिकाणी धाड ; तब्बल १ कोटी १२ लाखांचा दंड वसूल

जाफराबाद :तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी झडती घेत कारवाई केली आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या या मोहिमेत ४९ अवैध वाहने पकडली असून, त्यापैकी २७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ४३ ठिकाणी छापे टाकून तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार डॉ. सारिका भगत यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकांनी केली. या मोहिमेत मंडळाधिकारी, तलाठी आणि स्थानिक महसूल अधिकारी सहभागी होते.
४८९ ब्रास वाळू साठा जप्त, बोटींचे साहित्य नष्ट
महसूल पथकाने जाफराबाद तालुक्यातील विविध नदीकाठच्या भागांमध्ये अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी धाड टाकली. ४३ ठिकाणी तपासणी करताना ४८९ ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच नदीपात्रात असलेल्या बोटींचे साहित्य नष्ट करण्यात आले. पथकांना कारवाईदरम्यान अडचणींचा सामना करावा लागला, कारण नदीपात्र मुख्य रस्त्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. तरीही पथकाने धाडसाने ही कारवाई पूर्ण केली.
१६ अवैध बोटी नष्ट, ८० लाखांचा मुद्देमाल जप्त
मागील वर्षभरात महसूल विभागाने कुंभारझरी, हनुमंतखेडा, आळंद आणि देऊळझरी परिसरातही कारवाई करून १६ अवैध बोटी नष्ट केल्या आहेत. या कारवाईत सुमारे ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे.
“अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कारवाई सुरूच” तहसीलदार डॉ. सारिका भगत
“अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध आमची मोहीम अखंड सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. महसूल विभाग वाळूमाफियांना रोखण्यासाठी आणखी कठोर कारवाई करेल,” असा इशारा तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी दिला.या कारवाईनंतर तालुक्यातील वाळूमाफियांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाने यापुढेही अशा कारवाया सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.