बनावट चलनाचे रॅकेट उघडकीस ;कोल्हापुरातील पोलिसच ठरला मास्टरमाईंड!
१ कोटी रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; मिरज पोलिसांची थरारक कारवाई

मिरज :
“खाकीवालाच ठरला चलाखीवाला!” अशीच चर्चा मिरज–कोल्हापूर परिसरात रंगली आहे. कारण, बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा सूत्रधार इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत कर्मचारी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९९ लाख २९ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा आणि साहित्य असा एकूण एक कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी उघड केलेला प्रकार
संशयित सुप्रीत देसाई मिरजेत बनावट नोटा खपविण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून कोल्हापुरातील मुख्य टोळीचा माग काढण्यात आला. तपासात समोर आले की, नोटांची छपाई राहुल जाधव करत होता, तर वितरणाचे काम इब्रार इनामदार, सुप्रीत देसाई आणि नरेंद्र शिंदे यांच्याकडे होते.
रुईकर कॉलनीत बनावट नोटांचे छपाई केंद्र
कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीतील एका घरात जाधव मशीनद्वारे २०० व ५०० रुपयांच्या हुबेहुब बनावट नोटा छापत होता. पोलिसांनी तेथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. तपासात समोर आले की इब्रार इनामदार हा २००६ मध्ये पोलिस दलात भरती झालेला असून सध्या कोल्हापूर पोलिसांच्या मोटार विभागात चालक म्हणून कार्यरत आहे.
तो गेल्या काही दिवसांपासून रजेवर होता आणि त्याच काळात या टोळीशी संबंध ठेवून नोटा छपाई व वितरणाचे काम करत होता.
महामार्गावर थरार…
इब्रार व नरेंद्र शिंदे हे दोघे मुंबईहून आलेल्या सिद्धेश म्हात्रे याला बनावट नोटा देण्यासाठी पेठनाका परिसरात आले होते. पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही पकडले.
त्यांच्याकडून ९८ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या कारवाईनंतर संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला.
संशयितांची यादी..,
-
इब्रार आदम इनामदार (४४) – पोलिस चालक, कोल्हापूर
-
सुप्रीत काडप्पा देसाई (२२) – गडहिंग्लज
-
राहुल राजाराम जाधव (३३) – कोरोची, हातकणंगले
-
नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०) – राजारामपुरी, कोल्हापूर
-
सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८) – मालाड (पूर्व), मुंबई
सर्वांना अटक करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राहुल जाधव सराईत गुन्हेगार….
राहुल जाधव हा आधीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. या टोळीची आणखी साखळी राज्यभर पसरलेली आहे का, याचा तपास सुरू असल्याचे एसपी संदीप घुगे यांनी सांगितले. गडहिंग्लज येथील सुप्रीत देसाई हा माजी सैनिकाचा मुलगा. स्थिर कुटुंब असूनही “झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी” तो या टोळीत सामील झाला. त्याचे संपर्क व भूमिकेचा तपास सुरू आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, पुनम पाटील, सचिन कुंभार, अभिजित पाटील यांच्यासह संपूर्ण पथकाने ही धाडसी कारवाई केली.