जिल्हामहाराष्ट्र

बंदी असलेला नायलॉन मांजा पुन्हा बाजारात! गळा चिरून एक जण गंभीर जखमी; प्रशासन गाढ झोपेत का?

भोकरदन :
शासनाने ठाम बंदी घातलेला नायलॉन मांजा पुन्हा भोकरदनच्या आकाशात झेपावू लागल्याने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नियम, कायदे आणि आदेशांना हरताळ फासणाऱ्या काही व्यापाऱ्यांमुळे एका निरपराध व्यक्तीचा जीव धोक्यात आला आहे. साबेर खाँ लाल खाँ पठाण (वय ५०) रा. सिल्लोड असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शनिवारी सायंकाळी भोकरदन शहरातील महात्मा फुले चौक परिसरात साबेर खाँ लाल खाँ पठाण यांच्या गळ्यात हा घातक मांजा अडकला. तीक्ष्ण आणि धारदार मांजाने गळा खोलवर चिरला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या त्या व्यक्तीला येथील माजी नगरसेवक दिपक बोर्डे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जोगदंडे यांनी त्यांना तातडीने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

बंदी फक्त कागदावर, विक्री मात्र धडाक्यात!
राज्य सरकारने पक्ष्यांचे जीव आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नायलॉन मांजावर कठोर बंदी घातली आहे. तरीही, भोकरदन शहरातील काही पतंग साहित्य विक्रेते हा बंदी घातलेला मांजा लपवाछपवी करून विकत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बाजारपेठेत “गुप्त व्यवहार” सुरू असून, प्रशासन मात्र मुकदर्शक बनले आहे.

कोण देतो संरक्षण..?
प्रशासकीय यंत्रणा नायलॉन मांजावरील बंदी अमलात आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “घडलेली ही घटना प्रशासनासाठी इशारा आहे. आत्ता तरी जागे व्हा, अन्यथा पुढची घटना प्राणघातक ठरू शकते,” असा इशारा समाजसेवकांनी दिला आहे.
शहरातील नागरिक आणि पक्षीप्रेमी संघटनांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हा फक्त खेळ नाही, तर माणसांच्या जीवाशी खेळ आहे,” असे मत जनतेतून व्यक्त होत आहे. भोकरदन शहरात प्रशासनाने तात्काळ धडक मोहीम राबवून विक्रेत्यांची दुकाने तपासावी आणि बंदी घातलेला मांजा जप्त करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.