गायीवरची माया ठरली जीवघेणी ; दिव्यांग शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथील घटना

गाय म्हणजे केवळ जनावर नव्हे, तर शेतकऱ्याच्या कुटुंबाचा भाग असते… आणि याच मायेपोटी एका दिव्यांग शेतकऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून गायीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण नशिबाने त्यांना साथ न दिल्याने तोच प्रयत्न त्याच्या आयुष्याचा शेवट ठरला…!
मिळालेली माहिती अशी की, पळसखेडा (ता. भोकरदन) येथील भाऊसाहेब बाबुराव जाधव (वय ५५) हे रविवारी (ता.१२) दुपारी आपल्या पाळीव जनावरांना शेतातील बांधावर चारत होते. त्यावेळी एक गाय जवळच असलेल्या पाझर तलावात पाणी प्यायला गेली असता ती गाळात जाऊन अडकली. हे पाहून शेतकरी भाऊसाहेब यांनी तिला वाचवण्यासाठी जवळ जाऊन हाक दिली. मात्र, गायीला वाचवताना त्यांचा तोल गेला आणि ते थेट पाण्यात पडले. त्यांना पोहता न आल्याने काही क्षणातच ते पाण्यात बुडाले. गावकऱ्यांनी तत्काळ भोकरदन नगर पालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली. रईस कादरी, सुनील दळवी, टेकाळे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी अधिक असल्याने या पथकाने त्यांचा खूप वेळ शोध घेतला. अखेर त्यांना पाण्याबाहेर काढून तातडीने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी तपासून भाऊसाहेब जाधव यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक जाण्याने गावभर शोककळा पसरली. साधी राहणी, शांत आयुष्य जगणारा आणि जनावरांना लेकरांसारखी माया करणारा हा शेतकरी अशा दुर्दैवी शेवटाला भेटेल, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.
भाऊसाहेब यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. भोकरदन येथील टीव्ही केबल चालक काकाराव जाधव यांचे ते बंधू होत.
मदतीला धावले…
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रा. रणवीरसिंह देशमुख, राहुल ठाकुर, कृष्णा तळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपालिकेच्या पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबवून जाधव यांना बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर गावकऱ्यांनी शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.