राजकीय

भोकरदन नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा ‘गेमप्लॅन’ सज्ज “ही लढत सत्तेसाठी नव्हे, शहराच्या भविष्यासाठी!” — आमदार संतोष पाटील दानवे

भोकरदन :
भोकरदन नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडावर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत राज अध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बूथ स्तरावर हालचाली वाढवल्या असून, प्रत्येक प्रभागात पक्षाचा संघटनात्मक शिस्तबद्धपणा दिसू लागला आहे.

याच धोरणाचा भाग म्हणून रविवारी सकाळी प्रभाग क्रमांक ५ मध्ये झालेल्या आढावा बैठकीत आगामी लढतीची दिशा आणि कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली. देशमुख गल्ली येथील राम भैय्या देशमुख व माजी नगरसेवक प्रा. रणविरसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत प्रभागातील संभाव्य उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा झाली. या वेळी आमदार संतोष पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जित संदेश देताना स्पष्ट शब्दात सांगितले की, “भोकरदन नगरपरिषद निवडणूक ही केवळ राजकीय सत्तेसाठीची लढत नाही, तर शहराच्या उज्वल भविष्यासाठीची जबाबदारी आहे. प्रत्येक घरात पोहोचून पक्षाची विचारधारा, विकासाचा अजेंडा आणि जनहितासाठी राबवलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. आपली एकजूट आणि प्रामाणिकपणा हीच आपली खरी ताकद आहे.” आमदार संतोष दानवे यांच्या या वक्तव्यातून भाजप आता ‘मिशन भोकरदन’ मोडमध्ये गेल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी पक्षाच्या सर्व पातळ्यांवर समन्वयसाधला जात आहे. याबैठकीस माजी नगराध्यक्ष आशाताई माळी, माजी नगराध्यक्ष शेषराव सेठ सपकाळ, माजी नगराध्यक्ष मुकेश चिने, माजी नगरसेवक दीपक बोर्डे, राहूल ठाकूर, दीपक तळेकर, सुरेश शर्मा, सतिष रोकडे, मनोज थारेवाल, सुमित थारेवाल यास स्थानिक पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रभागातील अनेक प्रभावी नागरिक उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, तर नेतृत्वात रणनीतीची झलक दिसून आली. आगामी काही दिवसांत प्रभागनिहाय बैठका, प्रचार नियोजन आणि उमेदवार निश्चितीवर भाजपकडून अंतिम निर्णय होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.