भोकरदन तालुक्यात प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या – भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गाव हादरलं!

भोकरदन :
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील वालसंगी गावातील प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत गणेश वाघ (वय 28) आणि जयाबाई पांडुरंग गवळी (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही वालसंगी गावातीलच रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश वाघ आणि जयाबाई गवळी यांच्यात मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या नात्याबद्दल गावात आणि त्यांच्या नातेवाईकांत कुजबुज सुरू होती. परिणामी, दोन्ही कुटुंबांमध्ये वादाचे वातावरण निर्माण झाले होते. या वाढत्या तणावामुळे दोघांनीही अखेर टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
मंदिराजवळच गळफास
घटनेच्या पहाटेच्या सुमारास म्हणजेच रात्री तीन ते चारच्या दरम्यान, दोघेही मोटारसायकलवरून अजिंठा येथील कालिंका देवी मंदिराजवळील जंगलात गेले. तेथे काही वेळ चर्चा झाल्यानंतर त्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी ग्रामस्थांना दिसले भीषण दृश्य
सकाळी काही ग्रामस्थ तेथे गेले असता, झाडाला दोघांचेही मृतदेह लटकलेले अवस्थेत दिसून आले. त्यांनी तत्काळ पारध पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले असून डॉक्टरांनी दोघेही मृत झाल्याची पुष्टी केली.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पारध पोलिस तपास करीत आहेत. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातूनच आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गावात शोककळा
या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण वालसंगी गावात शोककळा पसरली आहे. गावातील नागरिक व नातेवाईक या घटनेने हादरले आहेत.