जिद्द, जनाधार आणि स्पष्टवक्तेपणाच्या बळावर उभारलेल्या मुरब्बी नेतृत्वाचा गावकुसातून दिल्लीपर्यंतचा दमदार प्रवास
माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे वाढदिवस विशेष..!

गावकुसातील मातीचा गंध अंगात साठवून, संघर्षाच्या पायवाटेवरून चालत थेट दिल्लीच्या सत्ताकेंद्रापर्यंत झेप घेणारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा ठसा नव्हे तर दबदबा निर्माण करणारा मुरब्बी दिग्गज नेता म्हणजे रावसाहेब दानवे… आज १८ मार्च म्हणजेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या झंझावाती आणि प्रेरणादायी प्रवासाकडे पाहिले, तर तो एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने घडवलेल्या असामान्य इतिहासाची साक्ष देतो.
भोकरदन तालुक्यातील जवखेडा या मातीत जन्मलेला हा नेता कोणत्याही राजकीय वारशाशिवाय उभा राहिला… पण जिद्द, धडाडी आणि लोकांशी असलेली घट्ट नाळ यांच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. ग्रामपंचायतीपासून सुरू झालेली वाटचाल सरपंच, पंचायत समिती सभापती, आमदार आणि पुढे थेट संसदेत पोहोचणारी ठरली. ग्रामपंचायतीपासून सुरुवात करत त्यांनी सत्ता आणि संघटन या दोन्ही पातळ्यांवर स्वतःची छाप उमटवली.
भोकरदन विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार आणि जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार—हा विक्रम त्यांच्या जनाधाराची साक्ष देतो. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा इतका प्रभावी आहे की कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वजण त्यांना प्रेमाने “दादा” म्हणून संबोधतात.
२०१४ साली त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून गाजवलेला काळ आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गावपातळीपासून ते सत्तेच्या केंद्रापर्यंत झेप घेतली. संघटन बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि निवडणुकांमधील धोरणात्मक निर्णय—या सर्व बाबींमध्ये त्यांनी खमक्या नेतृत्वाची झलक दाखवली. शिवाय प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारताच संघटनात नवी ऊर्जा निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राज्यात अभूतपूर्व यश संपादन केले. गावपातळीपासून ते सत्तेच्या शिखरापर्यंत भाजपला नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
केंद्रातीलमोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी प्रशासनातही आपली छाप सोडली. अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण क्षेत्रात त्यांनी काम करताना जनहिताला प्राधान्य दिले.
रावसाहेब दानवे हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते झुंझार आणि खमक्या नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या ग्रामीण ढंगातील स्पष्ट भाषेमुळे ते नेहमी चर्चेत राहिले, पण याच शैलीमुळे ते जनतेच्या मनात घर करून बसले.
शेवटी इतकेच :
राजकारणाच्या रणांगणात “दादा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुरब्बी दिग्गज नेत्याला “संग्रामभूमी” परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा — त्यांचा दबदबा असाच कायम राहो आणि जनसेवेची वाटचाल अधिक बळकट होवो!
