राजकीय
जालना काँग्रेसमध्ये पुन्हा राडा ; महिला पदाधिकाऱ्यांचा बैठकीतच गोंधळ, जिल्हा नेतृत्वाविरोधात उघड बंड
दोन दिवसांपूर्वी भाजपसोबत ‘सेटलमेंट’चे आरोप ; आता पक्ष बैठकीतच संतापाचा स्फोट


जालना | संग्रामभूमी न्यूज नेटवर्क
जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस चिघळत असून दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षांवर भाजपसोबत ‘सेटलमेंट’ केल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज जालना येथे झालेल्या पक्ष बैठकीतच जोरदार गोंधळ घालत उघड बंड पुकारले. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमधील वाद आता थेट रस्त्यावरून बैठकीच्या व्यासपीठावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.
आज झालेल्या बैठकीदरम्यान संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नेतृत्वाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत पक्षातील मनमानी, गटबाजी आणि कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा आरोप केला. अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी जिल्हाध्यक्षांवर भाजपशी आर्थिक व्यवहारातून तिकीट वाटप केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्या आरोपांचे पडसाद शांत होण्याआधीच आजच्या बैठकीतील गोंधळामुळे काँग्रेसमधील अंतर्गत भूकंप आणखी तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
“सामान्य कार्यकर्त्यांना डावलले जाते”, “पक्षात एकाधिकारशाही सुरू आहे”, “निवड प्रक्रियेत पारदर्शकता नाही” अशा आरोपांसह महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नेतृत्व हटविण्याची मागणीही बैठकीत केल्याची माहिती आहे.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील ही उघडी बंडाळी पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात असून, जिल्ह्यातील गटबाजी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या प्रकरणावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.