
भोकरदन प्रतिनिधी :
भोकरदन येथील सोमीनाथ सुरसे यांनी आपल्या कन्येच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाप्रसंगीच थेट विवाह लावून देत समाजासमोर एक आदर्श आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
आजच्या काळात विवाह सोहळे म्हणजे अतोनात खर्च, दिखावा आणि आडंबर यांचे प्रतीक बनले असताना, सुरसे कुटुंबाने मात्र साधेपणा आणि सामाजिक जाणीव जपत एक वेगळी दिशा दाखवली. सुपारी फोडण्याच्या पारंपरिक कार्यक्रमातच विवाह उरकून त्यांनी अनावश्यक खर्चाला ठामपणे फाटा दिला.
या अनोख्या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक चर्चा रंगू लागली असून, अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे. वाढत्या महागाईच्या काळात अशा पद्धतीने विवाह केल्यास आर्थिक ताण कमी होऊन समाजात नवा आदर्श निर्माण होऊ शकतो, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
सुरसे कुटुंबाच्या या कृतीमुळे साधेपणातूनही मोठे संस्कार आणि विचार व्यक्त होऊ शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.