
केज, संग्रामभूमी न्यूज नेटवर्क :
एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज (गुरुवार, दि. ९ एप्रिल) सकाळी भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. एका कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकाऱ्याच्या अकाली जाण्याने संपूर्ण महसूल यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लातूर–अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. राकेश गिड्डे हे आपल्या कारने प्रवास करत असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, राकेश गिड्डे हे त्यांच्या कामातील शिस्त, वेग आणि जनतेशी असलेल्या संवेदनशील वागणुकीसाठी ओळखले जात होते. अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे प्रशासनातील सहकारी तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर विविध राजकीय, सामाजिक तसेच प्रशासकीय स्तरावरून शोकसंदेशांचा वर्षाव होत असून, “एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावल्याची” भावना व्यक्त होत आहे.