भोकरदन: आन्वा पाटीजवळ शॉर्टसर्किटमुळे भीषण आग ; गहू, मका व झाडांचे मोठे नुकसान

भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन शहराजवळील आन्वा पाटी परिसरात शेतातील उभ्या पिकांना अचानक आग लागून भीषण दुर्घटना घडली असून या आगीत मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. कैलास गोराडे आणि राजू गोराडे यांच्या शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला लागलेली आग काही क्षणांतच भडकत गेली आणि तिने भीषण रूप धारण केले.
या आगीने अल्पावधीतच परिसरातील शेतांना वेढा घालत मोठ्या क्षेत्रातील गहू जळून खाक झाला. उभ्या पिकांवर शेतकऱ्यांचा मोठा खर्च झालेला असताना एका क्षणात सर्व काही राख झाल्याने संबंधित शेतकरी हतबल झाले आहेत. यंदाच्या हंगामातील अपेक्षित उत्पन्नावर पाणी फिरले असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शेतातून गेलेल्या विजेच्या लाईनमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उन्हाची तीव्रता आणि कोरडे वातावरण यामुळे आगीने वेगाने फैलाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या आगीचा फटका शेजारील शेतांनाही बसला असून मोहन शास्त्री आणि मंदार शास्त्री यांच्या शेतातील गहू, मका तसेच सागवानाची झाडे जळून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकाच घटनेत अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
घटनेची माहिती मिळताच भोकरदन नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले होते. मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने उग्र रूप धारण करून बहुतांश पिक जळून खाक झाले होते. स्थानिक शेतकरी व नागरिकांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या घटनेमुळे आन्वा पाटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विजेच्या लाईनची देखभाल आणि सुरक्षा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
🔳 तत्काळ धाव; भाजप नगरसेवकांची घटनास्थळी उपस्थिती
भोकरदन : या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे नगरसेवक तथा भाजपा शहर मंडळाध्यक्ष प्रा. रणवीर सिंह देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्यांनी या घटनेची प्रशासनाला तात्काळ माहिती देत नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला.