राजकीय

कुसुम सौर योजनेतील गोंधळावर विधानसभेत संतोष दानवे आक्रमक ; शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण?

मुंबई संग्रामभूमी न्यूज नेटवर्क :

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधत भोकरदन मतदार संघाचे भाजपा आमदार संतोष दानवे यांनी कुसुम सौर ऊर्जा योजनेतील अडचणींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी आमदार संतोष दानवे यांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी आमदार संतोष दानवे म्हणाले की, राज्यात कुसुम सौर ऊर्जा योजनेअंतर्गत सुमारे ८.५ लाख सौर पंप बसवण्यात आले असून, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, CRI सारख्या कंपन्यांच्या निष्काळजीपणा आणि मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना ४ ते ५ महिने पंप दुरुस्ती व सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

रब्बी हंगामात पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. केवळ कागदोपत्री दंड करून चालणार नाही, तर संबंधित कंपन्यांवर प्रत्यक्ष आणि कडक कारवाई करण्याची मागणीही आमदार संतोष दानवे यांनी यावेळी केली.

याशिवाय, शेतकऱ्यांना वेळेवर सेवा मिळावी यासाठी जिल्हा स्तराऐवजी तालुका स्तरावर सर्व्हिस स्टेशन उभारणे, स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित अर्जांच्या प्रक्रियेत ऑनलाइन पारदर्शकता आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यंत्रणेत मूलभूत बदल करण्याची गरज असून, याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका आमदार संतोष दानवे यांनी मांडली.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.