काँग्रेसची बैठक की रणांगण? जिल्हाध्यक्षांनी बूट उगारल्याचा महिला पदाधिकाऱ्याचा आरोप.!
नेतृत्वाविरोधातील रोष अनावर ; अंतर्गत संघर्षाने गाठला उच्चांक

बैठकीदरम्यान आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच वातावरण प्रचंड तापले. महिला पदाधिकाऱ्यांनी हात उगारून आक्रमक पवित्रा घेतल्याचा दावा करण्यात येत असतानाच, त्यास प्रत्युत्तर म्हणून जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख बूट काढण्यासाठी खाली वाकल्याचा प्रकार घडल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर बैठक काही काळासाठी अक्षरशः रणांगणात परिवर्तित झाली. वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नेतृत्वावर मनमानी कारभार, गटबाजी, कार्यकर्त्यांचा छळ आणि तिकीट वाटपातील अपारदर्शकता यांचे गंभीर आरोप करत विद्यमान नेतृत्व हटविण्याची उघड मागणी केली. “सामान्य कार्यकर्त्यांना संपवण्याचा डाव सुरू आहे,” असा संतप्त आरोप यावेळी करण्यात आला.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हाध्यक्षांवर भाजपशी आर्थिक व्यवहारातून तिकीट वाटप केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्या आरोपांची धग शांत होण्याआधीच आजच्या या नाट्यमय प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये फुट अटळ असल्याची चर्चा सुरू झाली असून पक्षश्रेष्ठी या प्रकरणावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीतच असा गोंधळ उडाल्याने विरोधकांकडूनही पक्षावर टीकेची झोड उठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.