जालना महानगरपालिका निवडणूक रणधुमाळीत रावसाहेब दानवेंची टोलेबाजी; सभेत हशा अन् आरोपांची सरबत्ती

जालना | प्रतिनिधी
जालना महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे. जालना येथे नुकत्याच झालेल्या एका प्रचार सभेत बोलताना दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी करत सभेत हशा पिकवला.
“मी आमदार नाही, मात्र एक नाही तर दोन आमदारांचा बाप आहे,” असे विधान करताच सभास्थळी एकच हशा पिकला. पुढे बोलताना दानवे म्हणाले, “मी आमदाराचा बाप नसतो तरीही मी भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे जालन्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी राज्य व केंद्र सरकारकडून आणण्यासाठी माझी नेहमी तगमग असते आणि पुढेही राहील.”
लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना दानवे म्हणाले, “मी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी खचलो नाही. पराभवानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालो. मी कधीही कोणावर आरोप केला नाही की मला कुणामुळे पराभव पत्करावा लागला.”
याचवेळी त्यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटले, “मला पाडून तुम्ही लोकसभेला कल्याण काळे यांना निवडून दिले. आता घ्या, आता तुमचे कल्याण करून,” असे म्हणताच सभेत पुन्हा एकदा हशा पिकला.
यानंतर थेट आरोप करताना दानवे म्हणाले की, “कल्याण काळे यांनी गेल्या दोन वर्षांत जालन्यासाठी दोन लाख रुपयांचाही निधी आणलेला नाही.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे.
दानवेंच्या या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, विरोधकांकडून यावर काय प्रत्युत्तर दिले जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.