जालना जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा : 24.90 कोटींच्या अपहारप्रकरणी आणखी दोन आरोपी अटकेत, आतापर्यंत 13 जण जेरबंद

जालना | प्रतिनिधी :
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शासनाच्या अनुदानात मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात फरार असलेल्या आणखी दोन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 आरोपी अटकेत आहेत.
नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाने वेळोवेळी चार शासन निर्णय (GR) काढून बाधित शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले होते. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यात याद्या अपलोड करण्याचे काम पाहणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी नावे (ज्यांच्या नावावर शेती नाही) याद्यांमध्ये समाविष्ट करून शासनाची अनुदानाची रक्कम परस्पर परत घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली. समितीच्या चौकशीत 240 गावांमध्ये तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा शासकीय निधी अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 453/2025 अंतर्गत 22 तलाठी, तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातील 5 कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील 1 कर्मचारी अशा एकूण 28 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा नोंद झाल्यानंतर अनेक आरोपी फरार झाले होते. आरोपींनी मोबाईल वापरणे टाळले होते तसेच सोशल मीडियापासूनही दूर राहत पोलीस तपासात अडथळे निर्माण केले होते. तरीही आर्थिक गुन्हे शाखेने सातत्यपूर्ण तपास करत आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, आरोपी विजय हनुमंत जोगदंड (वय 43, मंडळ अधिकारी) व दिनेश ज्ञानेश्वर बेराड (वय 35, सहाय्यक महसूल अधिकारी) हे गेल्या पाच महिन्यांपासून राजस्थान, दिल्ली व गुजरात या राज्यांमध्ये वेशांतर करून राहत होते. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करताना त्यांनी वारंवार ठिकाणे व मोबाईल बदलून पोलिसांची दिशाभूल केली होती.
गोपनीय माहितीच्या आधारे हे दोन्ही आरोपी जालना शहराच्या दिशेने येत असल्याचे समजताच आर्थिक गुन्हे शाखेने विशाल कॉर्नर परिसरात सापळा रचून त्यांना अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि प्रभारी उपअधीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.