महाराष्ट्र

बळीराजाच्या श्रमाला पाणंद रस्त्यांची जोड — आमदार संतोष दानवे

भोकरदन येथे आमदार संतोष दानवे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक

शेतकऱ्यांना शेतीकामांच्या प्रत्येक टप्प्यावर भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी दूर करून शेती उत्पादनाला गती देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या **“मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने”**ची अंमलबजावणी प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी आज तहसील कार्यालय, भोकरदन येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आमदार तथा पंचायत राज समितीचे अध्यक्ष संतोष दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी तसेच शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविताना शेतकऱ्यांना चिखल, खडतर वाटा आणि वाहतुकीअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर ही योजना ग्रामीण शेती व्यवस्थेला सक्षम करणारी ठरणार असून, पाणंद रस्ते दर्जेदार, टिकाऊ आणि निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावेत, अशा सक्त सूचना आमदार दानवे यांनी संबंधित विभागांना दिल्या. बळीराजाच्या श्रमाला या पाणंद रस्त्यांची जोड मिळेल असेही आमदार संतोष दानवे म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जनतेसमोर मांडला होता. त्याच धर्तीवर राज्य शासनाने शेतरस्त्यांच्या उभारणीला प्राधान्य देत ग्रामीण भागात शेती आणि बाजारपेठ यांच्यातील दुवा मजबूत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
ही योजना केवळ रस्ते निर्माण करण्यापुरती मर्यादित नसून, ती शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य दिशा देणारी आणि शेती अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बैठकीस उपविभागीय अधिकारी बी. सरवनन, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, नायब तहसीलदार एस. एस. मिसळ, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर व देविदास मगर, पोलीस निरीक्षक एस. एस. जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक नेटके, कृषी अधिकारी अमोल शिंदे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोकरदन व जाफ्राबाद येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वर्षभर उपयोगी पडतील असे सक्षम रस्ते उभारून शेतीमालाची वाहतूक सुलभ करणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि बाजारपेठेपर्यंत थेट जोडणी निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.