राजकीय

एकनाथ शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी

महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय चाल खेळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील  शिवसेना (शिंदे गट) ने आंबेडकरी चळवळीतील आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना अचानकपणे वाघमारे यांच्या नावाची घोषणा झाल्याने हा निर्णय शिंदेंचा राजकीय “मास्टरस्ट्रोक” मानला जात आहे.

डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील असून त्या शिक्षण क्षेत्रातून राजकारणात आलेल्या अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. इंग्रजी विषयात त्यांनी पीएचडी केली असून अनेक वर्षे त्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. प्रभावी वक्तृत्व, आंबेडकरी विचारसरणीवरील अभ्यास आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणारी नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्याचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथर चळवळीशी संबंधित होते. या पार्श्वभूमीवर वाघमारे यांनी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून त्या आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसल्या. अल्पावधीतच पक्षात सक्रिय भूमिका बजावत त्यांनी नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. आता राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवे वळण मिळाले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आंबेडकरी समाजातील अभ्यासू आणि आक्रमक महिला चेहरा पुढे करून शिंदे गटाने दलित-बहुजन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा स्पष्ट राजकीय संदेश दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात या निर्णयाचे परिणाम पाहायला मिळणार आहेत.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.