महाराष्ट्र

संघर्षातून उभा राहिला IPS अधिकारी.! ; भोकरदनच्या भिकन रोजेकरची UPSC मध्ये ८१२ वी रँक

घरची परिस्थिती अत्यंत हलकीची, त्यामुळे हालअपेष्टा आणि मर्यादित साधनसामग्री… पण डोळ्यांत मोठे स्वप्न आणि मनात अढळ जिद्द! या बळावर भोकरदन तालुक्यातील मजुराच्या मुलाने देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC नागरी सेवा परीक्षेत यश मिळवत इतिहास घडवला आहे. भिकन रोजेकर यांनी UPSC परीक्षेत अखिल भारतीय ८१२ वी रँक मिळवत आपल्या कुटुंबासह संपूर्ण जालना जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

भिकन रोजेकर यांचे बालपण अत्यंत साध्या आणि संघर्षमय परिस्थितीत गेले. वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना शिक्षणाचा खर्च भागवणेही कठीण होते. अनेक वेळा अडचणींचा डोंगर समोर उभा राहिला; परंतु परिस्थितीसमोर हार न मानता भिकन यांनी अभ्यासाची कास धरली. दिवस-रात्र मेहनत, चिकाटी आणि ध्येयावर असलेला अढळ विश्वास यांच्या जोरावर त्यांनी UPSC सारख्या कठीण परीक्षेची शिखरे सर केली.

देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, परंतु अंतिम यादीत मोजकेच उमेदवार स्थान मिळवतात. अशा स्पर्धात्मक परीक्षेत ८१२ वी रँक मिळवणे ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. या रँकमुळे भिकन रोजेकर यांचा भारतीय पोलिस सेवा (IPS) मध्ये प्रवेश होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

भिकन यांच्या यशाची बातमी गावात पोहोचताच आनंदाची लाट उसळली. कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य दिसून आले. साध्या घरातून निघालेला हा युवक आता देशसेवेच्या वाटेवर पाऊल ठेवत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भिकन रोजेकर यांचे यश हे केवळ एका विद्यार्थ्याचे यश नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांच्या ताकदीचे प्रतीक आहे. “परिस्थिती माणसाला थांबवत नाही; थांबवते ती हार मानण्याची वृत्ती,” हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

 

: कष्टांची पेरणी… यशाची कापणी

भिकन रोजेकर यांचे आई-वडील निरक्षर असले तरी मुलांनी शिकून मोठे व्हावे, हेच त्यांचे आयुष्यभराचे स्वप्न होते. स्वतः शिक्षणापासून दूर राहिले, पण मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी दिवस-रात्र कष्टाची पराकाष्ठा केली. “आम्ही शिकलो नाही, पण तुम्ही शिकून मोठे व्हा,” असे सांगत त्यांनी भिकन आणि त्यांच्या भावाला शिक्षणाची प्रेरणा दिली.

काही दिवसांपूर्वी भिकन यांच्या आईचा अपघात झाला आणि त्या अपंग झाल्या. घरावर संकट कोसळले, परिस्थिती अधिक कठीण झाली. तरीही वडिलांनी खचून न जाता मजुरी करत मुलांच्या शिक्षणासाठी झटणे सुरूच ठेवले. अडचणींच्या या वादळातही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कधीच खंड पडू दिला नाही.

आज भिकन रोजेकर यांनी UPSC परीक्षेत मिळवलेले यश हे केवळ त्यांच्या मेहनतीचे फळ नाही, तर आई-वडिलांच्या त्याग, कष्ट आणि स्वप्नांचेही फळ आहे. त्यांच्या या यशामागे पालकांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी दडलेली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.