आईसमोरच चालत्या दुचाकीवर तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू ; सहा महिन्यांच्या चिमुकलीला पोरकं करून गणेशचा निरोप.!

आन्वा संग्रामभूमी न्यूज नेटवर्क:
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील गणेश केशव गावंडे (वय २५) या तरुणाचा आज शनिवारी (ता.७) दुपारी चालत्या दुचाकीवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अवघ्या दोन वर्षांपूर्वी संसाराला सुरुवात केलेल्या गणेशने सहा महिन्यांच्या चिमुकलीला पोरकं करून अचानक घेतलेल्या या अखेरच्या निरोपामुळे संपूर्ण आन्वा गाव शोकमग्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गावंडे हे सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथे पोस्टमन म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. शुक्रवारी ते आपल्या आईसोबत बाहेर गावी गेले होते. शनिवारी दुपारी तीन वाजेदरम्यान ते दुचाकीने आन्वा गावात आले असता अचानक त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. काही कळण्याच्या आतच ते दुचाकीवरून आईसह खाली कोसळले. या दुर्दैवी घटनेत गणेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या आईला किरकोळ दुखापत झाली.
अत्यंत शांत, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावामुळे गणेश गावात सर्वांच्या आवडीचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षांपूर्वीच संसार थाटलेला आणि सहा महिन्यांची चिमुकली मुलगी व पत्नी असा परिवार मागे ठेवून गणेश कायमचा निघून गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे आन्वा परिसरात शोककळा पसरली असून गावकरी आणि नातेवाईकांकडून गणेशच्या आठवणींना अश्रूंनी उजाळा दिला जात आहे. त्यांच्या अकाली जाण्याने एक कर्तबगार तरुण हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.