सिटीस्कॅननंतर रुग्णांना सीडी व डिजिटल प्रत देणे बंधनकारक करा – केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची सभागृहात मागणी

मुंबई संग्रामभूमी न्यूज नेटवर्क:
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. राज्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन तपासणी केल्यानंतर संबंधित रुग्णांना त्या तपासणीची सीडी व डिजिटल प्रत देणे कंत्राटदार व खाजगी संस्थांसाठी अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी भाजपा आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सभागृहात केली.
सध्या अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने सिटीस्कॅन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तपासणी झाल्यानंतर अनेकदा रुग्णांना त्याचा संपूर्ण अहवाल किंवा डिजिटल स्वरूपातील प्रत मिळत नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरांकडे जाताना रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो.
याबाबत बोलताना केज मतदारसंघाच्या भाजपा आमदार नमिता मुंदडा यांनी सांगितले की, रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय तपासणीची संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. सिटीस्कॅन तपासणीची सीडी किंवा डिजिटल प्रत रुग्णांकडे असल्यास पुढील उपचार करताना डॉक्टरांना अचूक निदान करण्यास मदत होते आणि रुग्णांचा वेळ व खर्चही वाचतो.
त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन सेवा देणाऱ्या कंत्राटदार व खाजगी संस्थांना तपासणीनंतर रुग्णांना सीडी आणि डिजिटल प्रत देणे बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी ठोस मागणी त्यांनी सभागृहात केली.
ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील लाखो रुग्णांना वैद्यकीय तपासणीची माहिती सहज उपलब्ध होऊन उपचार प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.