ताज्या घडामोडी

जालना–जळगाव रेल्वे मार्गाला गती; दानवे–खडसे यांच्यात छत्रपती संभाजीनगरात सकारात्मक चर्चा.!

मराठवाडा आणि खानदेश या दोन महत्त्वाच्या भागांना थेट जोडणाऱ्या प्रस्तावित जालना–जळगाव रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भारत सरकारच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यात आज रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे भेट झाली. यावेळी जालना–जळगाव प्रस्तावित रेल्वे मार्गासंदर्भात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.

मराठवाडा आणि खानदेश या दोन्ही भागांच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मार्गामुळे दोन्ही प्रदेशांतील व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक तसेच पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विशेषतः अजिंठा परिसरासह अनेक पर्यटन स्थळांपर्यंत पोहोच अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

या भेटीत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रशासकीय प्रक्रिया, तसेच पुढील टप्प्यांतील कामांबाबत सविस्तर माहिती घेत हा प्रकल्प अधिक जलद गतीने पूर्णत्वास कसा नेता येईल याबाबत सकारात्मक संवाद साधला. रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेली विविध प्रशासकीय बाबी, नियोजन आणि समन्वय यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

तसेच या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर आवश्यक असलेल्या पुढील कार्यवाहीबाबत दानवे आणि खडसे यांच्यात चर्चा झाली. मराठवाडा आणि खानदेशातील नागरिकांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, लवकरात लवकर कामाला वेग देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

जालना–जळगाव रेल्वे मार्ग प्रत्यक्षात साकार झाल्यास मराठवाडा व खानदेश या दोन्ही भागांतील आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात झालेली ही सकारात्मक चर्चा भविष्यातील कार्यवाहीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.