महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरचा लोकप्रिय रील स्टार अरुण तुपे यांचे अचानक निधन

सोशल मीडियावर स्पष्ट मत मांडणारा अरुण तुपे काळाच्या पडद्याआड

छत्रपती संभाजीनगर येथील लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अरुण तुपे यांच्या अकाली निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. आपल्या स्पष्ट आणि थेट शैलीत सामाजिक तसेच राजकीय विषयांवर रील्स बनवणारा हा तरुण अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अरुण तुपे हे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होते. समाजातील घडामोडींवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या रील्सना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असे. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओची चाहत्यांना उत्सुकता असायची. आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी अल्पावधीतच सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

मात्र, सतत लोकांशी संवाद साधणारा आणि आपल्या विचारांमुळे चर्चेत असणारा हा तरुण अचानक निघून गेल्याची बातमी समोर येताच अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्याच्या आठवणी शेअर करत चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. “तुझ्या रील्सची आठवण कायम राहील”, “असा अचानक जाऊ नकोस” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अरुण तुपे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.

एका साध्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवला; मात्र त्याचा हा प्रवास इतक्या लवकर थांबेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अरुण तुपे यांच्या अकाली जाण्याने सोशल मीडिया विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.